रक्ताच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी समाजाला आवाहन!
पारनेर / भगवान गायकवाड,
जैन सोशल फेडरेशनचे आनंद ऋषीजी ब्लड सेंटर, अहिल्यानगर येथील जनसंपर्क अधिकारी व सोशल वर्कर सुनील अशोक महानोर यांनी स्वतः २७ व्या वेळी रक्तदान करून समाजात एक उत्कृष्ट आदर्श निर्माण केला आहे.
सध्या दिवाळीच्या सुट्यांमुळे शाळा-कॉलेजांना सुट्टी आहे, परिणामी रक्त संकलनामध्ये मोठी घट झाली आहे, ज्यामुळे रुग्णांसाठी रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.रक्त तुटवड्याची गंभीर स्थिती
दिवाळीच्या काळात शाळा, महाविद्यालये आणि सामाजिक संस्थांचे रक्तदान शिबिर थांबल्याने रक्त संकलनाचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. मात्र, फायदेशीर रुग्ण, बाळंतपण झालेल्या माता, ॲनिमियाग्रस्त रुग्ण तसेच अपघातग्रस्त रुग्णांना नेहमीच तातडीने रक्ताची आवश्यकता भासते. अशा परिस्थितीत, रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे, ज्यामुळे रुग्णांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे मोठे हाल होत आहेत.आनंद ऋषीजी ब्लड सेंटरकडून हा तुटवडा कमी करण्यासाठी नेहमीच विविध सामाजिक संस्था, महाविद्यालये आणि रक्तदात्यांना रक्तदान करण्याचे कळकळीचे आवाहन केले जाते.

स्वतः रक्तदान करून आदर्श….
या आवाहनाची सुरुवात स्वतःपासून व्हावी, या उदात्त सामाजिक भावनेतून सुनील अशोक महानोर यांनी आज २७ व्यांदा रक्तदान केले. समाजात जनजागृती करताना आपण स्वतः कृतीतून आदर्श निर्माण केला पाहिजे, यावर त्यांचा विश्वास आहे. महानोर म्हणाले, “आपण नेहमीच रक्तदानासाठी इतरांना आवाहन करतो, परंतु या आवाहनाला बळ देण्यासाठी आणि इतरांना प्रेरणा देण्यासाठी मी स्वतः रक्तदान केले आहे. रक्तदान करून बघा, रक्तदान करके देखो अच्छा लगता है.”महानोर यांनी समाजातील सर्व नागरिकांना, सामाजिक संस्थांना, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना तसेच स्वयंसेवकांना पुढे येऊन रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. आपले एक युनिट रक्त तीन जणांचे प्राण वाचवू शकते. हा थेंब-थेंब जमा होऊनच हा मोठा तुटवडा दूर होऊ शकतो, याची आठवण त्यांनी करून दिली.



