पारनेर / प्रतिनिधी,
पारनेर तालुक्याच्या उत्तर भागातील टाकळी ढोकेश्वर, वासुंदे, वडगाव सावताळ, खडकवाडी, वनकुटे, पळशी, पोखरी, कामटवाडी, कर्जुले हरिया यासह अनेक गावांमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मे महिन्याच्या शेवटी आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस झाला होता, परंतु त्यानंतर पाऊस थांबला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या असून, चातकाप्रमाणे ते पावसाची वाट पाहत आहेत.
या भागात बाजरी, मूग, सोयाबीन आणि विशेषतः कांदा ही पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. कांदा पिकाला सध्या पाण्याची तीव्र गरज आहे, परंतु पावसाअभावी पिके धोक्यात आली आहेत. पाण्याविना कांदा पिकाचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. यंदा पावसाच्या अनियमिततेमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. अनेकांनी कर्ज काढून पेरणी केली असून, आता पावसाअभावी त्यांची चिंता वाढली आहे.
शेतकरी नेते भाजप किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष वडगाव सावताळ सेवा सोसायटीचे चेअरमन शिवाजीराव रोकडे यांनी सांगितले की “पावसाशिवाय पिके वाचवणे कठीण आहे. कांद्याला पाणी न मिळाल्यास उत्पादन घटेल.”
स्थानिक कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना पाण्याचा योग्य वापर आणि पर्यायी उपाययोजनांचा सल्ला दिला आहे, परंतु पावसाशिवाय परिस्थिती सुधारणे कठीण आहे. शेतकरी आता पावसाच्या आगमनासाठी प्रार्थना करत आहेत. पावसाने दडी मारल्याने या भागातील शेती संकटात सापडली असून, शेतकऱ्यांचे भवितव्य अधांतरी आहे.
तालुक्याच्या उत्तर भागात टाकळी ढोकेश्वर वासुंदे व वडगाव सावताळ परिसरात दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. पिण्याच्या पाण्याची ही परिस्थिती बिकट आहे. राज्यात इतर भागात पाऊस पडत असताना या भागात अजिबात पाऊस नाही त्यामुळे पुढील महिन्या अखेरपर्यंत जर पाऊस झाला नाही तर येणाऱ्या काळात लवकरच चारा छावण्या सुरू कराव्या लागतील. – शिवाजी रोकडे, चेअरमन सेवा सोसायटी वडगाव सावताळ