भाळवणी परिसरातूनच धवल क्रांतीची खरी सुरुवात – आमदार काशिनाथ दाते


संदीप ठुबेंकडून दुध संघाला गतवैभव प्राप्त करून देण्याची अपेक्षा

पारनेर / भगवान गायकवाड,

पारनेर तालुक्यातील दुग्धव्यवसायाचा पाया भाळवणी परिसरानेच रचला असून, येथूनच तालुक्यातील धवल क्रांतीची खरी सुरुवात झाल्याचे मत पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते यांनी व्यक्त केले.

भाळवणी येथील नागबेंदवाडीमध्ये गणेशोत्सवाच्या निमित्ताने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता सोहळ्यात ग्रामस्थांच्या वतीने पारनेर तालुका दुध संघाचे नवनिर्वाचित चेअरमन संदीप ठुबे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी आमदार दाते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार दाते म्हणाले की, “भाळवणी गावाने विधानसभा निवडणुकीत दिलेल्या प्रचंड मताधिक्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे. महायुतीच्या माध्यमातून दुध संघाच्या निवडणुकीत विजयी झालेल्या चेअरमन संदीप ठुबे यांच्या नेतृत्वात दुध संघाला पुन्हा गतवैभव प्राप्त होईल, याची खात्री आहे. सत्तर-ऐंशी हजार लिटर दूध संकलन करणाऱ्या या संघाची आवक मध्यंतरीच्या काळात काही कारणांस्तव केवळ सात हजार लिटरवर आली होती. मात्र ठुबे यांच्या अनुभवाचा आणि संघर्षशील स्वभावाचा उपयोग करून हा संघ पुन्हा एकदा सत्तर हजार लिटरच्या टप्प्यापर्यंत पोहोचेल, अशी माझ्यासह माजी खासदार डॉ.सुजय विखे पाटील व महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांची अपेक्षा आहे.”

आमदार दाते यांनी जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीच्या सभापती पदाच्या माध्यमातून परिसरात केलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेत, आगामी काळातही त्याहून वेगाने जास्तीत जास्त विकासकामे राबवली जातील, असा विश्वास व्यक्त केला. तसेच सामाजिक, राजकीय आणि कौटुंबिक वाटचाल करताना शांतता व संयम राखण्याचे आवाहनही त्यांनी ग्रामस्थांना केले.

सन्मान सोहळ्यात ह.भ.प. सिनारे महाराज, सरपंच सौ. लिलाबाई रोहकले, विकास रोहकले, संदीप कपाळे, नागेश रोहकले, ठकचंद रोहकले यांसह ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“दुध संघाच्या चेअरमनपदी निवड झाल्यानंतर अनेक ठिकाणी माझा सन्मान झाला. पण माझ्या गावाने केलेला आजचा सन्मान आयुष्यभर लक्षात राहील. मा. खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार काशिनाथ दाते सर, राहुल पाटील शिंदे यांच्यासह महायुतीच्या सर्व वरिष्ठांनी माझ्यावर सोपवलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडून दुध संघाला नक्कीच गतवैभव प्राप्त करून देईन.”

▪️ संदीप ठुबे, चेअरमन, पारनेर तालुका दुध संघ

Advertisement
Share This News On

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *