सुजित झावरे पाटलांचा पुढाकार, पारनेरच्या रस्त्यांचा मार्ग मोकळा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत प्रश्न निकाली
पारनेर/प्रतिनिधी :
पारनेर तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो आणि रोजगार हमी योजनेअंतर्गत महाराष्ट्रात सर्वाधिक कामे याच तालुक्यात होतात. याच पार्श्वभूमीवर 2023-24 या आर्थिक वर्षात पारनेर तालुक्यात अनेक पानंद रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली होती. मात्र, कामे स्थगित केल्याने ग्रामीण भागातील विकासकामांना मोठा अडथळा निर्माण झाला होता. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सुजित झावरे पाटील यांनी पुढाकार घेत मंगळवारी (दि. 16 सप्टेंबर) मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी रस्त्यांची कामे त्वरित सुरू करण्याचा आग्रह धरला.
झावरे पाटलांच्या या प्रयत्नांना यश आले असून, अहिल्यानगर जिल्ह्यासाठी स्थगिती आदेश शिथिल करण्यात आला आहे. यामुळे आता पारनेर तालुक्यातील पानंद रस्त्यांची कामे पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था दूर होऊन स्थानिकांना प्रवास सुलभ होईल. याबाबत सुजित झावरे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले, पारनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना चांगल्या रस्त्यांची गरज आहे. या कामांना स्थगिती मिळाल्याने स्थानिकांचे हाल होत होते. उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी या प्रश्नाला गांभीर्याने घेऊन त्वरित निर्णय घेतला, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आता ही कामे गतीने पूर्ण होतील आणि ग्रामीण भागातील विकासाला चालना मिळेल.
स्थानिकांनी या यशाबद्दल झावरे पाटलांचे कौतुक केले आहे. या निर्णयामुळे रोजगार हमी योजनेअंतर्गत रस्त्यांचे काम पूर्ण होऊन तालुक्यातील दळणवळण सुधारेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. हा निर्णय ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणारा ठरेल, असेही स्थानिकांचे मत आहे.



