दिनांक: 18 सप्टेंबर 2025
अहिल्यानगर जिल्हा बालविवाहमुक्त करायचं हे लक्ष्य समोर ठेवून या मिशनसाठी स्नेहालयचा “उडान” प्रकल्प अखंड झटत आहे. या अनुषंगाने
मी स्वतः जिल्हा परिषदेत गेलो होतो, आत्ताच ग्रामसभा झाल्या आणि गावोगावी कशाप्रकारे जनजागृती चालली आहे ते पाहत होतो. मनात सतत एकच विचार – “ही मोहीम केवळ योजना न राहता प्रत्यक्षात कशी उतरवता येईल?”
त्याच वेळी फोन वाजला. तो कॉल होता आमच्या मुक्ती वाहिनी समन्वयक शाहिद शेख यांच्या यांनी सागितले की, “सर, सरपंच मॅडम आणि एक मुलगी कार्यालयात आली आहे. तिची अवस्था खूप गंभीर आहे, आपण लगेच यावे.”
क्षणाचाही विलंब न करता मी काम बाजूला ठेवलं आणि थेट कार्यालयात पोहोचलो. सरपंच मॅडम आधीपासूनच बसल्या होत्या. त्यांचा चेहरा गंभीर होता. त्यांनी लगेच सांगितलं –
> “कदम सर, गावातील ही मुलगी खूप त्रासात आहे. तिचं म्हणणं आहे की तिच्यासोबत घडलेलं पुन्हा तिच्या बहिणींना होऊ नये. आपण या प्रकरणात काहीतरी करायलाच हवं.”
सरपंच या गावातील बाल संरक्षण समितीच्या अध्यक्षा असल्यामुळे त्यांनी ही जबाबदारी स्वतःहून घेतली होती. त्यांची तत्परता आणि संवेदनशीलता मला खूप भावली.
तो क्षण माझ्यासाठी धक्का होता, पण त्याचबरोबर आनंदाचाही – कारण आता गावपातळीवरही संवेदनशीलता निर्माण झाली आहे. पूर्वी सरपंच लोक शांत बसायचे, “गावात बदनामी होईल” म्हणून तोंड उघडायचे नाहीत. पण आज, स्नेहालयच्या वर्षानुवर्षांच्या प्रयत्नामुळे एक गाव स्वतःहून आवाज उठवत होतं.
सरपंच मॅडम पुढे म्हणाले की,
> “ही मुलगी आमच्या गावाची आहे. हिच्यासोबत जे झालंय ते अमानुष आहे. तिचं रक्षण करण्याची जबाबदारी ही माझी आणि आमच्या समितीची आहे. आपण सोबत आहात, त्यामुळे आम्ही निर्धास्त आहोत.”
हे ऐकून माझ्या मनात एकाच क्षणी आशेचा किरण दिसला. गावाचा नेता जर एवढा संवेदनशील असेल, तर ही लढाई अर्धी जिंकलीच आहे.
यानंतर मी माझी टीम एकत्र केली – उडान प्रकल्पाची मुक्ती वाहिनी. शाहिद शेख,पूजा दहातोंडे, प्रवीण दरंदले आणि आमचे इतर कार्यकर्ते. सगळ्यांना समजावलं –
कायदेशीर प्रक्रिया काटेकोर पाळायची.
मुलीचा बचाव करायचा, पण तिच्या भविष्यात कोणतीही अडचण निर्माण होणार नाही याची पूर्ण दक्षता घ्यायची.
पोलिसांशी समन्वय साधायचा.
आणि सर्वात महत्त्वाचं – मुलीला ऐकून घ्यायचं. तिच्या शब्दांत तिचा आवाज जगापुढे आणायचा. हे मार्गदर्शन केले.यानंतर मुलीसोबत संवाद साधला.ती मुलगी आमच्यासमोर बसली होती. तिच्या डोळ्यांत भय, लाज, रडण्याची झलक आणि तरीही एक हुरहूर होती की, “कोणीतरी मला ऐकणार आहे.” आम्ही शांतपणे बसलो, तिचं ऐकायला तयार. तिचे पहिले शब्द होते –
> “सर, माझं आयुष्य लहानपणापासूनच उद्ध्वस्त झालं. मला आठवतं, माझे बाबा सतत दारू पित होते. आई रोज त्यांच्याशी भांडायची. शेवटी आई कंटाळली… तिनं आम्हाला सोडलं आणि दुसरं आयुष्य सुरू केलं. बाबा देखील थांबले नाहीत, त्यांनी दुसरं लग्न केलं. आम्हा चार बहिणी मात्र कोणाच्याही कवेत नव्हतो. बाबा आम्हाला लांबच्या नातेवाईकांकडे सोडून गेले.”
ती थोडा वेळ शांत झाली, मग डोळ्यातून अश्रू वाहत म्हणाली –
> “सर, मी चौघींमध्ये मोठी आहे. माझं शिक्षण कसंतरी नववीपर्यंत झालं. त्यानंतर तेही थांबलं. माझ्या लहान बहिणींपैकी एकीचं शिक्षण आठवीवर थांबलं, तिसरी बहिण कसंतरी दहावीत जातेय, आणि सगळ्यात लहान अजून पाचवीत आहे. पण शिक्षणापेक्षा आमच्यासाठी शेती आणि घरकाम महत्त्वाचं होतं. कारण त्या नातेवाईकांनी 14 एकर शेत दुसऱ्यांकडून कर्जावर घेतलं होतं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही चौघी बहिणी त्या शेतात काम करायचो. घरी आल्यावरही भांडी, झाडलोट, स्वयंपाक – सगळं आमच्याकडून करून घेतलं जायचं.”
तिचा आवाज इथे खूपच दाटला. थोडा वेळ तिने शब्द गिळले, मग डोळ्यांतून पाणी पुसून ती पुढे म्हणाली –
> “माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी वेदना… ती मला 16 वर्षांची असताना आली. ज्यांनी आम्हाला सांभाळायचं होतं, ते माझे काका… त्यांनीच माझ्यावर अत्याचार केला. पहिल्यांदा मी घाबरले, काहीच बोलले नाही. पण हे वारंवार सुरू झालं. त्यांची बायकोला कळलं, पण तिनं माझ्याचं ताठरलं. घरातल्या बहिणीही मला दोष द्यायला लागल्या. सर, मला असं वाटायचं की, “मीच चुकीची आहे.””
ती थोडावेळ थरथरली. मग पुढे बोलताना तिच्या डोळ्यांतली भीती आणि अपमान एकत्र मिसळला होता –
> “माझ्या बाबांना हे सांगितलं, पण त्यांनी काही केलं नाही. कारण बाबा स्वतः दारू पिऊन पडायचे. त्यानंतर काकांनी आणि बाबांनी माझे 16 वर्षात लग्न लावून टाकलं.तेपण एक 40 वर्षांचा पुरुषवसोबत, तो टाकला, वयस्कर, लंगडा आणि व्यसनी होता. त्याच्याकडून एक लाख रुपये घेऊन माझं लग्न ठरवलं. सर, मी फक्त 16 वर्षांची होते… पण माझं कुणी विचारलं नाही. मला वाटलं आता आयुष्य संपलं.”
थोडं थांबून ती म्हणाली –
> “लग्नानंतर तीन महिने झाले. तिथेही मला त्रास झाला परंतु मी कधी जास्त दिवस राहिले नाही. आणि त्यांनी मला परत माझ्या काकांकडे पाठवलं. तिथे पुन्हा तेच अत्याचार सुरू झाले. माझं संपूर्ण आयुष्य नरक झालं. आम्हा बहिणींना दिवस रात्र शेतात काम करायला लावलं. आणि मी मात्र त्या नरकात अडकून गेले. माझा आवाज कुणालाच ऐकू येत नव्हता.”
आता तिचा आवाज किंचित उंचावला, रडण्यापेक्षा तो हळूहळू एका आक्रोशात बदलत गेला –
> “सर, त्यानंतर तीन वर्षांनी मी 19 वर्षांची झाले तरी माझं आयुष्य बदललं नाही. त्यांनी पुन्हा माझे लग्न लावले त्यावेळी पैसे घेतले. लग्न झाल्यानंतर ते काका मला वारंवार घरी बोलवण्यासाठी प्रयत्न सुरू असायचं माझ्या नवऱ्याला सांगायचं की तिला माझ्याकडे पाठवत जा ती आणखीन खूपच लहान आहे. परंतु मी जात नसायचे, परंतु रक्षाबंधनाच्या निमित्ताने काकांनी पुन्हा मला बोलावलं… आणि पुन्हा माझ्यावर जबरदस्ती केली. ह्यावेळी मात्र मी गप्प बसले नाही. मी थेट माझ्या नवऱ्याला ही गोष्ट सांगितली. मला भीती होती की तो मला दोष देईल, पण त्याने माझ्यावर विश्वास ठेवला. तुम्ही ताबडतोब ही गोष्ट सरपंचांना मॅडम यांना सांगितले.मग त्यांनी तुमच्यासोबत म्हणजेच स्नेहालयची ‘उडान मुक्ती वाहिनी’ आहे, जी मुलींसाठी काम करते. ही माहिती त्यांना होते. म्हणून मी आज इथे आले आहे. सर… मी फक्त एकच मागते – मला न्याय द्या. माझ्या बहिणींनाही हाच नरक बघावा लागू नये.”
तिची ही सगळी वेदना आणि व्यथा ऐकून आणि तिच्या शब्दांनी अंगावर काटा आला. ती एकेक घटना सांगत होती, आणि प्रत्येक वाक्यात तिच्या आयुष्याचा छळ, वेदना, आणि अन्याय उघड होत होता. माझ्या शेजारी बसलेल्या पूजा दहातोंडे यांनीही खूप संयमाने तिचं ऐकलं.
आम्ही सगळ्या माहितीची पडताळणी करून ताबडतोब पुढचा निर्णय घेतला. कायदेशीर प्रक्रिया सुरू करायचीच.
त्या साठी राहुरी पोलिस स्टेशनशी संपर्क साधला. पोलिस निरीक्षक संजय ठेगे यांना आम्ही सगळी वस्तुस्थिती सांगितली.
आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त संवेदनशीलतेने त्यांनी प्रतिसाद दिला. कोणताही वेळ न दवडता त्यांनी 10-12 पोलिसांचं पथक तयार केलं आणि ताबडतोब आरोपीच्या ठिकाणी रवाना केलं. रात्रीचा वेळ होता, पण पोलिसांच्या चेहऱ्यावर कसलीही उदासीनता नव्हती. उलट निर्धार दिसत होता.
त्या पथकाने कारवाई करत सदर आरोपीला ताब्यात घेतलं. तीनही बहिणींची सुटका करण्यात आली. हा क्षण आमच्या सगळ्यांसाठी मोठा दिलासा होता. कारण ज्या मुलीने स्वतःच्या आयुष्याचा नरक अनुभवला, ती आपल्या बहिणींना तसाच वाटा मिळू नये म्हणून झगडत होती – तिच्या त्या हुरहुरीला उत्तर मिळालं होतं.
रात्रभर आम्ही पोलिस स्टेशनमध्ये होतो. पूजाने आणि प्रवीणने दिवसभर-रात्र झोपेचा विचार न करता या मुलीसोबत राहून तिला प्रत्येक क्षणी धीर दिला. तिच्या तक्रारीची नोंद करताना ॲड. बागेश्री जरंडीकर मॅडम यांचं कायदेशीर मार्गदर्शन घेतलं. POCSO, IPC आणि बालविवाह प्रतिबंधक कायद्यांनुसार कोणते कलम लागू करायचे हे निश्चित करण्यात आलं.
मुलीच्या सासरच्यांनाही – नवरा, सासू-सासरे, दीर – यांना विश्वासात घेतलं. त्यांचं समुपदेशन केलं. “ही मुलगी तुमच्या घरात परतल्यावर तिच्या भूतकाळामुळे तिला दोष देऊ नका, तिला नाकारू नका. उलट तिला आधार द्या, हेच तुमचं खरं पुण्य होईल” – हा संदेश दिला. सुरुवातीला थोडा संकोच होता, पण समुपदेशनानंतर तेही तिच्या बाजूने उभे राहिले.
—
त्या रात्री पोलिस स्टेशनचं दृश्य वेगळंच होतं –
एका बाजूला न्याय मागणारी मुलगी,
दुसऱ्या बाजूला तिचं ऐकून घेणारी संवेदनशील पोलिस टीम,
आणि सोबत उडान मुक्ती वाहिनीचे कार्यकर्ते – जे रात्रभर झोप न घेता, स्वतःच्या ऊर्जेने आणि जिद्दीने न्याय मिळवून देण्यासाठी सज्ज होते.
त्या रात्रीच्या अनुभवानंतर मी मनातून ठरवलं की ही घटना फक्त एक मुलगीच्या न्यायाची कहाणी नाही, तर संपूर्ण समाजासाठी जागृतीचा संदेश आहे. मुलीने सांगितलेली प्रत्येक वेदना, तिच्या डोळ्यातली भीती, तिच्या शब्दांतून व्यक्त झालेला अपमान – हे सर्व वाचक आणि समाजातल्या प्रत्येक व्यक्तीस थरकाप निर्माण करेल, असं मला जाणवलं.
स्नेहालयची उडान मुक्ती वाहिनी हे फक्त एक प्रकल्प नाही, तर एक प्रेरक मिशन आहे – वंचित, शोषित, संकटात असलेल्या मुलींना आणि महिलांना न्याय मिळवून देणे, त्यांचे हक्क सुरक्षित करणे, आणि त्यांना समाजात पुन्हा उभे करणे. ही मुक्ती वाहिनी फक्त कायदेशीर कारवाई करत नाही; ती प्रत्येक पीडिताच्या मनोबलाची काळजी घेते, तिच्या मानसिक स्वास्थ्यासाठी समुपदेशन करते, आणि तिच्या भविष्यासाठी सुरक्षित धोरण ठरवते.
या घटनेतून दिसले की – समाजात जागृतकता निर्माण करणं किती आवश्यक आहे. गावातील सरपंच आणि बाल संरक्षण समिती यांनी ताबडतोब पुढाकार घेतल्यामुळे प्रकरण जलदगतीने हाताळलं गेलं. त्यांनी अंगणवाडी सेविका, इतर कर्मचारी यांचा समन्वय साधला, आणि प्रशासनाला तत्परतेने काम करण्यासाठी प्रेरित केलं.
पोलिसांची संवेदनशीलता आणि तत्परता पाहून स्पष्ट झालं की – न्याय मिळवण्यासाठी योग्य व समर्थ हात असणे किती महत्त्वाचे आहे. निरीक्षक संजय ठेगे आणि त्यांच्या पथकाने रात्रीच्या वेळेसही संकोच न करता पीडित मुलीला न्याय मिळवून दिला.
सोशल वर्कर पूजा दहातोंडे आणि प्रवीण दरंदले यांनी दिवसभर काम करून, रात्रभर जागरण करून, प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक घेतलं. त्यांच्या ऊर्जेच्या, समर्पित, आणि न थकणाऱ्या कामगिरीमुळे मुलीला न्याय मिळाला. या घटनेतून त्यांनी दाखवलेले समर्पण, धैर्य, आणि संवेदनशीलता समाजासाठी प्रेरणादायी उदाहरण बनली.
स्नेहालयने मागील 36 वर्षांपासून समाजातील वंचित लोकांसाठी, विशेषतः मुलींसाठी, अनवरत संघर्ष आणि कार्य केले आहे. 1990 पासून सुरू असलेल्या हेल्पलाइन आणि विविध प्रकल्पांनी हजारो मुलींना व महिलांना संकटातून मुक्त केले. या सर्व अनुभवामुळे स्नेहालय आणि उडान मुक्ती वाहिनीला समाजात विश्वास आणि प्रतिष्ठा मिळाली आहे.
आज ही घटना दाखवते की – एकत्रित प्रयत्न, संवेदनशील प्रशासन, समर्पित कार्यकर्ता, आणि कायदेशीर मार्गदर्शन यांच्यामुळे समाजात बदल शक्य आहे. या घटनेतून समाजाला शिकवण मिळते की, पीडितांचे ऐकणे, त्यांना आधार देणे आणि न्याय मिळवून देणे हे प्रत्येक नागरिकाचे, प्रत्येक संस्थेचे कर्तव्य आहे.
…………………………………
लेखक…
प्रविण कदम
उडान प्रकल्प व्यवस्थापक
मो.9011026495
मुक्ती वाहिनीची न्याय यात्रा – लेखक प्रवीण कदम



