Headlines

” गोव्यातील देहव्यापारात अहिल्यानगरचा टक्का लक्षणीय ” – अरुण पांडे

अहिल्यानगर / भगवान गायकवाड ( पारनेर),

गोवा राज्यात  देहव्यापारात 10 हजारांहून जास्त महिलांना वापरले जात असून यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातून आणलेल्या बालिका आणि महिलांची संख्या लक्षणीय वाढली आहे. नगर जिल्ह्यातील सर्व सामाजिक संस्था, बालकल्याण समिती, महिला आणि बालविकास विभाग तसेच पोलिसांसह सर्व शासकीय यंत्रणांनी यासंदर्भात व्यापक जागृती मोहीम राबवावी ,असे आवाहन गोव्यातील अर्झ  ( ARZ :अन्याय रहित जिंदगी ) या संस्थेचे संस्थापक  अरुण पांडे यांनी केले.



स्नेहालय संस्थेच्या  स्नेहाधार प्रकल्पाने गोव्यातील देह व्यापारात मोठ्या संख्येने आढळणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील बालिका आणि महिलांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय संवेदनाक्षमीकरण कार्यशाळेचे आयोजन केले होते. अहिल्यानगर बाल कल्याण समितीचे सदस्य तुषार कवडे, एडवोकेट अनुराधा येवले, रोहिणी कोळपकर, जिल्हा पर्यवेक्षक अधिकारी श्रीकांत मरकड, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी प्रशांत गायकवाड, गोवा आणि महाराष्ट्रात मानसिक आरोग्यात पथदर्शी काम करणारे  मानसोपचार तज्ञ डॉ. रुपेश पाटकर, स्नेहालय  सचिव डॉ. प्रीती भोंबे, स्नेहाधार प्रकल्पाचे मानद संचालक एडवोकेट श्याम आसावा आदींनी यावेळी झालेल्या परिसंवादात सहभाग घेतला.

श्री. पांडे यांनी सांगितले की,  विविध मार्गाने अहिल्यानगर जिल्ह्यातील  -दुर्लक्षित समाजघटकातील मुली आणि महिलांना गोव्यात आणले जाते.  रोजगार संधीचे आमिष आणि प्रेमाचे आभास देऊन त्यांचे ग्राहकांमार्फत धंदेवाईक लैंगिक शोषण केले जाते. श्री पांडे यांनी पुढे नमूद केले की, महाराष्ट्रातील अहिल्यानगर आणि मराठवाड्यासह विविध 17 जिल्ह्यातून गोवा येथे आणण्यात आलेल्या अनैतिक मानवी वाहतुकीच्या  158  प्रकरणात त्यांच्या संस्थेने यशस्वी हस्तक्षेप केलेला आहे.  यातील बरीच प्रकरणे ही ग्रामीण भागातील आहेत. तस्करी करणारी व्यक्ती ही अनेकदा परिचयाचीच असते. त्यामुळे स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये   गुन्हा नोंदला जात नाही.



मानवी तस्करी आणि बळींचे मानसिक आरोग्य

डॉ. रुपेश पाटकर यांनी आपले दाहक अनुभव सांगितले. तस्करी करणारे संघटित गुन्हेगार धंद्यासाठी नकार देणाऱ्या महिला – मुलींना चटके देणे, अमानुष मारहाण करणे, उपाशी ठेवणे असे अमानवी अत्याचार करतात. त्यामुळे  मुली व महिलांची अवस्था पशुवत होते. त्यांना जबरदस्तीने व्यसने लावली जातात. त्यामुळे देह व्यापारातून बाहेर पडण्याचे मार्ग बंद होतात. मानसोपचार आणि समूपदेशन यांचा प्रभाव उपयोग करून अशा महिलांचे कौटुंबिक पुनर्वसन शक्य होते. बळींना रोजगार शिक्षण देऊन पायावर उभे केले जाते, असे डॉ. पाटकर यांनी अनेक उदाहरणांसह सांगितले. मोबाईल , विविध डेटिंग साइट्स आणि समाज माध्यमांचा  वापर करून मुलींची मोठ्या प्रमाणावर तस्करी करण्यात येत आहे. हे रोखण्याबाबत सामाजिक संस्था आणि कार्यकर्त्यांनी करावयाच्या उपायोजनांबाबत कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले.
प्रास्तविकात ऍड. शाम आसावा यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील  अनैतिक मानवी वाहतूकीची आणि संस्थात्मक उपाययोजनांची  माहिती दिली.  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्या घोरपडे, रूपाली सोयम, अमर पाटील, सिद्धार्थ दाभाडे, कावेरी रोहोकले, मंदाकिनी मोकळे, मनीषा शिंदे, प्रतीक्षा अंभोरे यांनी परिश्रम घेतले.

Advertisement
Share This News On

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *