Headlines

सरसकट पंचनामे करा : कृषी मंत्री ना. दत्ता मामा भरणे

मदतीसाठी आमदार दाते यांची मागणी

पारनेर / भगवान गायकवाड, 


अतिवृष्टीमुळे पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ओला दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने पिकं पडली, वाहून गेली आणि शेतकरी आर्थिक संकटात सापडले. या पार्श्वभूमीवर विधानसभा सदस्य काशिनाथ दाते सर यांनी महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री नामदार दत्ता मामा भरणे यांना पत्र देत शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी केली आहे.

आमदार दाते यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, “अतिवृष्टीमुळे मतदारसंघातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. कृषी व महसूल विभाग पंचनामे करत आहेत. मात्र, शेतकऱ्यांना वेळेवर दिलासा मिळणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे तातडीने आर्थिक नुकसान भरपाई द्यावी.”

याच पार्श्वभूमीवर कृषिमंत्री दत्ता मामा भरणे यांनी पारनेर तालुक्यातील नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत प्रशासनाला तात्काळ पंचनामे करून प्रस्ताव सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले.

यावेळी बोलताना मंत्री भरणे म्हणाले, “शेतकऱ्यांच्या आयुष्यभराच्या स्वप्नांचे या पावसात नुकसान झाले आहे. शासन त्यांच्या पाठीशी ठाम उभे आहे. पंचनामे पूर्ण होताच मदत निधीचा शासन निर्णय त्वरीत जाहीर होईल.”

या पाहणीवेळी पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष विक्रम कळमकर, महिला जिल्हा उपाध्यक्षा सोनाबाई चौधरी, महिला तालुकाध्यक्षा सुषमा रावडे, माजी जिल्हा परिषद सदस्य वसंत चेडे, भाजप सरचिटणीस सागर मैड, जिल्हा उपाध्यक्ष विकास पवार, उद्योजक  मंगेश दाते, शिवसेना उपतालुकाप्रमुख अजिंक्य दरेकर, सरपंच मनोज मुंगशे, गणेश शेळके आदी पदाधिकाऱ्यांसह स्थानिक शेतकरी उपस्थित होते.

Advertisement
Share This News On

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *