पारनेर / भगवान गायकवाड,
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पारनेर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) तातडीने दखल घेतल्याने पारनेर-सुपा रोडवरील खड्डे युद्धपातळीवर बुजविण्यात आले आहेत. यामुळे रस्त्यांनी अक्षरशः चकाकी घेतली असून, या मार्गावरून नियमित प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांनी आणि वाहनचालकांनी मोठे समाधान व्यक्त केले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे २ ऑक्टोबरला दसरा मेळाव्याच्या निमित्ताने पारनेर तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. या महत्त्वाच्या दौऱ्यापूर्वी प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आणि रस्त्यांच्या कामांना गती मिळाली. पावसाळ्यामध्ये या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते, ज्यामुळे वाहतुकीसाठी प्रचंड अडथळे निर्माण होत होते आणि अपघातांची शक्यता वाढली होती.
जनतेकडून सातत्याने मागणी होत असूनही दुर्लक्षित राहिलेले हे खड्डे, आता उपमुख्यमंत्री महोदयांच्या दौऱ्याच्या निमित्ताने अवघ्या काही दिवसांत दुरुस्त झाल्यामुळे प्रवासाचा मार्ग सुकर झाला आहे. विशेषतः सुपा औद्योगिक वसाहत आणि परिसराकडे ये-जा करणाऱ्या चाकरमान्यांसाठी ही मोठी दिलासादायक बाब ठरली आहे.
अजित पवार यांच्या दौऱ्यामुळेच किमान रस्ते दुरुस्त झाले, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत. आता फक्त रस्त्यांची ही उत्तम स्थिती कायम राहावी, अशी अपेक्षा स्थानिक जनता व्यक्त करत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यानिमित्त पारनेर-सुपा रोड चकाकला



