Headlines

पहिल्या आरोग्य साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी डॉ. संजय ओक; महाराष्ट्र आरोग्य भूषण पुरस्कार २०२५ स्मिता व रवींद्र कोल्हे दांपत्याला जाहीर

पारनेर / भगवान गायकवाड,


रुग्ण हक्क परिषद, मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष, मंत्रालय, मुंबई आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुणे आरोग्य महोत्सव आणि पहिल्या आरोग्य साहित्य संमेलनाचे उद्घाटन येत्या १९ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९:०० वाजता बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते होणार आहे.

या संमेलनाचे अध्यक्षपद वैद्यकीय क्षेत्रातील सुप्रसिद्ध लेखक व साहित्यिक डॉ. संजय ओक यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. तसेच, यंदाचा प्रतिष्ठित ‘महाराष्ट्र आरोग्य भूषण पुरस्कार २०२५’ मेळघाट, अमरावती येथील पद्मश्री डॉ. स्मिता कोल्हे आणि डॉ. रवींद्र कोल्हे यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार एक लाख रुपये रोख आणि मानपत्र अशा स्वरूपाचा आहे. अशी माहिती स्वागत अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी दिली.


पहिल्या आरोग्य साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. संजय ओक हे बालरोग शस्त्रक्रिया व लॅप्रोस्कोपी क्षेत्रातील अग्रगण्य शल्य चिकित्सक म्हणून ओळखले जातात. २४ नोव्हेंबर १९५९ रोजी मुंबईत जन्मलेल्या डॉ. ओक यांनी मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून शिक्षण घेतले. ते सेठ जी.एस. वैद्यकीय महाविद्यालयाचे माजी डीन तसेच केईएम रुग्णालयाचे माजी डीन म्हणून कार्यरत राहिले. पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ, मुंबई यांच्या माजी कुलपतीपदावर कार्यरत होते. वैद्यकीय क्षेत्राबरोबरच साहित्य क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान आहे.


डॉ. संजय ओक म्हणाले, “प्रथमच अशा पद्धतीचे पहिले आरोग्य साहित्य संमेलन पार पडत असून संमेलन अध्यक्षपदी माझी निवड झाल्याने अधिक जबाबदारी वाढली आहे.”
या भव्य संमेलनात डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. प्रमोद जोग, डॉ. प्रदीप आवटे, डॉ. मिलिंद भोई, राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. अजय चंदनवाले, पुणे मनपा आरोग्य प्रमुख डॉ. नीना बोराडे आणि आरोग्य उपसंचालक डॉ. भगवान पवार यामध्ये सहभागी होणार आहेत. आरोग्य साहित्य संमेलनामध्ये विविध कार्यक्रमांचा समावेश आहे. यामध्ये समस्त पुणेकर नागरिक, कलाकार, पत्रकार आणि लेखकांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी, औषधे, इंजेक्शन्स आणि शस्त्रक्रियेसाठी प्रमाणपत्र वितरण, आरोग्य साहित्य आढावा, चर्चासत्रे, परिसंवाद, कवी संमेलन, संगीत रजनी, व्याख्याने, पुस्तक प्रकाशन आणि स्मरणिका प्रकाशन यांचा समावेश आहे. याशिवाय, मुख्यमंत्री फिरता दवाखाना योजनेचे उद्घाटन आणि कलाकार साहित्यिक पत्रकार यांच्यासह २५ हजार पुणेकर नागरिकांची नामांकित डॉक्टरांकडून तपासणी व मोफत औषध तसेच मोफत उपचार व शस्त्रक्रिया शिबीर राबवले जाणार आहे.
मुख्यमंत्री सहायता निधीचे कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक, आरोग्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष श्री. उमेश चव्हाण, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष श्री. मेघराजराजे भोसले, आय.एम.ए. महाराष्ट्र राज्याचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. भानुप्रताप बर्गे आणि श्री. मिलिंद गायकवाड तसेच मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष, पुणे जिल्ह्याचे मुख्य समन्वयक श्री. राजेंद्र कदम, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यवाह सुनीताराजे पवार यांनी या संमेलनास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. संयोजन समितीने या महोत्सवाला सर्वांनी सहभागी होऊन यशस्वी करण्याची विनंती केली.

Advertisement
Share This News On

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *