Headlines

सोनई येथील संजय वैरागर मारहाण प्रकरणातील गुन्हेगारांना तातडीने अटक करण्याची बहुजन संघटनांची मागणी!

पारनेर / भगवान गायकवाड,


    सोनई येथे मातंग समाजातील युवक संजय नितीन वैरागर याला काही गुन्हेगार प्रवृत्तीच्या समाजकंटकांनी अमानुष मारहाण करून गंभीर जखमी केल्याच्या निषेधार्थ आणि आरोपींना तातडीने अटक करून कठोर शासन करण्याच्या मागणीसाठी पारनेर तालुका बहुजन समविचारी संघटनांनी प्रशासनास निवेदन दिले आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, ही निंदनीय घटना दिनांक १९/१०/२०२५ रोजी सायंकाळी ८ वाजता सोनई येथील स्वामी विवेकानंद चौक परिसरात घडली. संजय वैरागर या तरुणाला काही समाजकंटकांनी मारहाण करून उचलून नेले. मारहाण करताना त्याच्या पायावर चारचाकी गाडी घालून, लाथा-बुक्क्यांनी, तसेच लोखंडी रॉडने अमानुषपणे मारहाण करण्यात आली. एवढ्यावरच न थांबता, एका डोळ्यामध्ये चाकू खुपसण्यात आला आणि दहा-बारा गुन्हेगारी वृत्तीच्या समाजकंटकांनी त्याच्या तोंडात व अंगावर लघुशंका केल्याचा अतिशय निंदनीय आणि समाज विघातक प्रकार घडला.


सदर गंभीर कृत्य करणाऱ्या समाजकंटकांना त्वरित अटक करून कठोरातील कठोर शिक्षा करावी, या मागणीसाठी खादी ग्रामोद्योग संचालक अमित जाधव, आर पी आय (आंबेडकर गट) तालुकाध्यक्ष किरण सोनवणे, भीम आर्मी संघटना तालुकाध्यक्ष संजय सोनवणे, भारतीय बौद्ध महासभा तालुकाध्यक्ष संपत पवार, युवती तालुकाध्यक्ष आरती सोनवणे यांच्यासह पारनेर तालुका बहुजन समाजातील समविचारी संघटनांनी पारनेर पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांना निवेदन सादर केले आहे.

          निवेदनात पुढे नमूद केले आहे की, सदर समाजकंटक हे सोनई व परिसरात कायम दहशतीचे वातावरण निर्माण करत असतात. तसेच, या गंभीर प्रकरणाला सत्ताधारी नेते दडपण्याचा प्रयत्न करत आहेत, ही अतिशय शरमेची बाब आहे. त्यामुळे, लवकरात लवकर या गुंडांना अटक करून कठोर शासन करावे, अशी दलित व इतर बहुजन समाजाची तीव्र मागणी आहे.या निवेदनावर ईश्वर भोसले, अविनाश देशमुख, गोरख सूर्यवंशी, अविनाश रोकडे, रामदास साळवे, प्रदीप मोरे, गणेश सोनवणे, सुनील शिंदे, राजु गायकवाड, सीताराम लव्हाडे, बाळासाहेब सोनवणे, ॲड. मोनिका सोनवणे, रमेश गायकवाड, राजेश सांगवे, दीपराज सोनवणे, दिलीप इंगळे, निलेश विधाटे, प्रकाश उघडे, गेणुभाऊ उघडे, साठे संतोष, धम्मपाल जाधव, सोनवणे योगेश, रामकृष्ण पवार, ॲड. मयुरी जाधव, दादू जाधव, भानुदास साळवे, साळवे बी टी, उमेश साळवे, अनिल देठे, संग्राम खोडदे, अशोक खोडदे आदींसह अनेक मान्यवरांच्या स्वाक्षऱ्या आहेत. बहुजन समविचारी संघटनांनी या अमानुष कृत्याचा तीव्र निषेध केला असून, जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत आपला लढा सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे.

Advertisement
Share This News On

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *