पारनेर / भगवान गायकवाड,
रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमती सुंदराबाई गहिनाजी लंके माध्यमिक विद्यालय वडझिरे येथे प्रा. तुषार ठुबे सर यांचे गुरुकुल अंतर्गत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनपर व्याख्यान पार पडले. यावेळी बोलताना प्रा. तुषार ठुबे यांनी विद्यार्थ्यांना समाजातील वाढती स्पर्धा, जागतिकीकरण आणि खाजगीकरणाला सामोरे जाताना स्पर्धा परीक्षांचे महत्त्व या विषयांवर साध्या सोप्या भाषेत आणि मार्मिक मार्गदर्शन केले.
ग्रामीण भागातील बहुतांश कुटुंबांची उपजीविका शेतीवर आहे आणि पुढील पिढी केवळ शेतीच्या आधारावर भवितव्य घडवू शकत नाही. खाजगीकरणाने अनेक क्षेत्रात कंत्राटी कामांना योग्य न्याय मिळत नाही. अशा परिस्थितीत स्पर्धा परीक्षेशिवाय आपल्याला पर्याय नाही, असे त्यांनी सांगितले.
अनेकजण नोकऱ्या नाही अशी ओरड सांगतात. शिक्षण म्हणजे केवळ पैसे कमवण्याचा उद्देश नव्हे. शिक्षणाने पैसे मिळतीलच, पैसे गैरमार्गानेही मिळतात. पण, समाजाचा शाश्वत विकास शिक्षणानेच होऊ शकतो. म्हणून, शिक्षण हे सत्य, न्याय व प्रतिष्ठेचे माध्यम असल्याचा दावा त्यांनी केला.
यावेळी विद्यालयाचे प्राचार्य राऊत सर, पाचरणे सर, ठाणगे सर, देशमुख मॅडम, शिंदे सर, भांड मॅडम, मावळे मॅडम, गायखे मॅडम, गाडिलकर मॅडम, वाळुंज सर, रोहोकले सर, अकोलकर मॅडम आदी उपस्थित होते.
शिक्षण म्हणजे सत्य, न्याय व प्रतिष्ठेची ओळख – प्रा. तुषार ठुबे सर
