पारनेर महाविद्यालयात ‘अविष्कार’ मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात संपन्न
पारनेर / भगवान गायकवाड,
आजपर्यंत झालेली भौतिक प्रगती ही मानवी गरजांमधूनच झाली असून, मानवी गरजाच खऱ्या अर्थाने नवनवीन शोधांची निर्मिती करतात,” असे महत्त्वपूर्ण प्रतिपादन प्रसिद्ध संशोधक प्रा. डॉ. रमेश सावंत यांनी केले. येथील न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘अविष्कार’ मार्गदर्शन कार्यशाळेत ते प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते.
यावेळी बोलताना प्रा. डॉ. सावंत यांनी विद्यार्थ्यांना संशोधक वृत्ती जोपासण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “संशोधन प्रकल्प निवडताना तो केवळ पदवीसाठी नसावा, तर त्याचा समाजाला प्रत्यक्ष उपयोग झाला पाहिजे. विज्ञानातील अनेक महान शोध हे केवळ उत्सुकतेपोटी लागले आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपली निरीक्षण शक्ती आणि उत्सुकता नेहमी जागृत ठेवावी.”
कार्यशाळेचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर यांनी भूषवले. त्यांनी व्हॉट्सॲपच्या शोधाचे उदाहरण देत विद्यार्थ्यांना सांगितले की, “मोठे शोध लावण्यासाठी विशेष पदवीची गरज नसते. तुमच्यातील उत्सुकता, निरीक्षण आणि कल्पनाशक्ती हेच अविष्काराचे खरे साधन आहे.” ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरातील समस्या ओळखून त्यावर नाविन्यपूर्ण उपाय शोधावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यशाळेचे प्रास्ताविक करताना उपप्राचार्य व शैक्षणिक संशोधन समन्वयक प्रा. डॉ. तुकाराम थोपटे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘अविष्कार’ उपक्रमामागील भूमिका स्पष्ट केली. विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती आणि उद्योजकतेला चालना देणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी अंतर्गत गुणवत्ता कक्षाचे समन्वयक प्रा. डॉ. दत्तात्रय घुंगार्डे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख व प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. डॉ. दीपक सोनटक्के यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी प्रा. डॉ. सरिता कुंडलिकर, प्रा. प्रांजली बोरुडे व प्रा. रामदास घोलप यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यशाळेला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.



