दैठणे गुंजाळ येथील श्री खंडेश्वर देवस्थान परिसर सुशोभीकरणाचे भूमिपूजन
पारनेर/प्रतिनिधी :
दैठणे गुंजाळ ग्रामस्थांचे झावरे कुटुंबावर नेहमीच प्रेम राहिले आहे. दैठणे गुंजाळ सारख्या ग्रामीण भागात विकास कामे करण्यावर माझा भर आहे. या भागात अनेक विकासाची कामे मार्गी लावणार आहे. विकास कामे करत असताना कोणतेही राजकारण करणार नसून विकासकामे करणे यावर माझा भर असणार आहे. असे मत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी व्यक्त केले.
दैठणे गुंजाळ येथील श्री खंडेश्वर देवस्थान परिसर सुशोभीकरण व विकास कामांचे भूमिपूजन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते नुकतेच पार पडले. या प्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष नामदेव गुंजाळ, सरपंच बंटी गुंजाळ, माजी सरपंच अशोक केदार, उपसरपंच पोपट जासूद, सबाजी येवले, जयसिंग गुंजाळ, मोहन गुंजाळ, संजय येवले, इंजि. आकाश येवले यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
सुजित झावरे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी ग्रामस्थांच्या मागणीनुसार श्री खंडेश्वर मंदिर परिसरातील भक्तनिवासाचा काँक्रीटीकरणाचा शब्द दिला होता. त्यांनी आपला शब्द पाळत निधी मंजूर करून अवघ्या २४ तासांत काम पूर्ण करण्याचा संकल्प केला. त्यानुसार, या कामाला सुरुवात झाली असून, ग्रामस्थांनी सुजित झावरे पाटील यांचे या योगदानाबद्दल सत्कार करून आभार मानले. यावेळी सरपंच, उपसरपंच, देवस्थानचे चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुजित झावरे पाटील यांच्या प्रयत्नांमुळे दैठणे गुंजाळ गावात अनेक विकासकामांना गती मिळाली आहे. या विकासकामांमुळे गावाचा चेहरामोहरा बदलत असून, ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. श्री खंडेश्वर मंदिर परिसरातील सुशोभीकरणामुळे भक्तांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. या कामामुळे गावातील धार्मिक आणि सामाजिक वातावरण अधिक सुदृढ होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली. सुजित झावरे पाटील यांच्या कार्याला ग्रामस्थांनी दाद दिली.
राजकारण न करता विकास कामे करत राहणार : सुजित झावरे पाटील



