अहिल्यानगर / प्रतिनिधी,
कोतवाली पोलीस ठाण्याच्या प्रभारीपदी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांची नियुक्ती करत नवी ऊर्जा आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी गुरुवारी (25 सप्टेंबर 2025) याबाबतचे आदेश जारी केले. यापूर्वी या पदावर असलेले पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांची तातडीने नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. आता गायकवाड यांच्याकडे ठाण्याची धुरा सोपवण्यात आली आहे,
संभाजी गायकवाड हे अनुभवी आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात. या पूर्वी जामखेड आणि पारनेर पोलीस ठाण्यांत त्यांनी यशस्वीपणे कारभार सांभाळला आहे. पुणे जिल्ह्यातील त्यांच्या कार्यकाळानंतर आता ते अहिल्यानगरात परतले असून, त्यांच्या नियुक्तीने कोतवाली ठाण्याला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे. त्यांचा कणखर आणि पारदर्शक कार्यपद्धतीचा वारसा पाहता, गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ते प्रभावी पावले उचलतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
कोतवाली ठाण्यापुढे सध्या अनेक आव्हाने आहेत. चोरी, घरफोडी, जबरी चोरी यासारख्या वाढत्या गुन्ह्यांना आळा घालणे हे गायकवाड यांच्यासमोरील सर्वात मोठे लक्ष्य आहे. स्थानिक नागरिकांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी त्यांना कठोर निर्णय आणि चपळ रणनीती आखावी लागणार आहे.
गायकवाड यांच्या धडाकेबाज नेतृत्वाखाली कोतवाली ठाण्याचे कामकाज नव्या उभारीने पुढे जाईल, अशी आशा नागरिकांना आहे. त्यांच्या प्रत्येक पावलाकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. गुन्हेगारीला चाप लावण्यासाठी गायकवाड काय जादू दाखवतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे!



