Headlines

स्वावलंबी संस्थांकडूनच शाश्वत विकास शक्य: रवी नगरकर

अहिल्यानगर / भगवान गायकवाड, पारनेर,

सरकारी अनुदाने किंवा कॉर्पोरेट सामाजिक दायित्वातून (CSR) मिळणारा आर्थिक सहयोग हा अनिश्चित असतो. त्यामुळे स्वावलंबी सामाजिक संस्थांमधूनच शाश्वत सामाजिक विकास शक्य आहे, असे स्पष्ट प्रतिपादन कल्याणी टेक्नोफोर्जचे व्यवस्थापकीय संचालक रवी नगरकर यांनी आज केले.


कल्याणी टेक्नोफोर्जच्या सहकार्याने स्नेहालय संस्थेच्या इसळक (जि. अहिल्यानगर) येथील हिंमतग्राम प्रकल्पात उभारण्यात आलेल्या संरक्षित शेती प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या प्रकल्पात अर्धा एकर जागेवर सुसज्ज पॉलिहाऊसची निर्मिती आणि तीन एकर क्षेत्रावर सेंद्रिय पद्धतीने फळे व भाजीपाल्याची लागवड करण्यात आली आहे. अविरत फाउंडेशनने या प्रकल्पासाठी तांत्रिक मार्गदर्शन पुरवले.


हिंमतग्रामचे कार्य आणि स्नेहालयचे स्वप्न साकार
हिंमतग्राम प्रकल्पाची सुरुवात २००२ मध्ये देहव्यापारातील महिला, एचआयव्ही/एड्स बाधित व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबाच्या सर्वांगीण पुनर्वसनासाठी झाली. येथे शेती, दुग्ध व्यवसाय आणि पॉलिहाऊसमधून भाज्यांचे उत्पादन घेतले जाते. कल्याणी टेक्नोफोर्जच्या मदतीने स्नेहालयचे एक जुने स्वप्न साकार झाले, असे संस्थेचे मुख्य पालक राजीव गुजर यांनी नमूद केले. महाराष्ट्रातील ३५ संस्थांचे पालकत्व पेलणारे रवी नगरकर म्हणजे सामाजिक संस्थांसाठीची ‘माउली’ आहेत, असे गौरवोद्गार यावेळी डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी काढले.
हिंमतग्रामचे प्रकल्प संचालक हनीफ शेख यांनी प्रकल्पाच्या कार्याचे महत्व विशद केले. कर्नाटकातून आलेल्या उच्चशिक्षित, पण नैराश्यामुळे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या एका एड्स बाधित तरुणास हिंमतग्रामने सावरले. त्या तरुणाने हिंमतीने शेवटच्या श्वासापर्यंत प्रकल्प फुलवला. तेव्हापासून आजवर सुमारे १५०० निराश लोकांना आत्महत्येपासून परावृत्त करून त्यांना जगण्याची नवी उमेद हिंमतग्रामने दिली आहे, असे श्री. शेख म्हणाले.


अन्न, प्रेम आणि स्वावलंबनाची वाट
यावेळी बोलताना श्री. नगरकर यांनी माणसाची मूलभूत गरज स्पष्ट केली: “सर्वप्रथम अन्न आणि नंतर प्रेम, ही माणसाची जगण्याची मूलभूत गरज आहे. त्यानंतर सुरक्षित निवारा आणि जगण्याची उमेद वंचितांचे जीवन फुलवते.” कोविड काळात कल्याणी टेक्नोफोर्जने शेकडो संस्थांमधील लाभार्थ्यांना अन्नधान्याची मदत केली. तेव्हापासूनच संस्थांना स्वावलंबनाचे शाश्वत मार्ग मिळवून देणे, हे आपले प्रमुख उद्दिष्ट बनले, असे त्यांनी सांगितले.
संरक्षित शेती प्रकल्पातून तांदळाचे विविध प्रकार, कोंबडीपालन आणि फुलशेती यांसारख्या प्रयोगशील पद्धती राबवून स्वावलंबनाची वाट कशी सोपी करता येते, याचे अनेक अनुभव त्यांनी कथन केले. आज शेतीच्या कामाला माणूस मिळणे हे सर्वात मोठे आव्हान असून, शेतीत तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त उपयोग अनिवार्य असल्याचे त्यांनी सांगितले. माती, सेंद्रिय कर्ब आणि पाण्याचे परीक्षण तसेच संगणकीय पद्धतीने पिकांचे व्यवस्थापन यांमुळे अत्यल्प मनुष्यबळातही मोठ्या क्षेत्रावरील शेती उत्पादक बनवण्यासाठी सामाजिक संस्थांना कल्याणी टेक्नोफोर्ज मदत करत आहे.
या पुनर्वसन प्रकल्पात एचआयव्ही-क्षयरोग बाधितांसह मानसिक आजारी, अत्याचारित महिला आणि निराधार अशा १२१ लोकांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निलेश तळेकर, निलेश शिर्के, कोमल शिर्के आणि नवनाथ गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.

Advertisement
Share This News On

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *