ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन घेतले आशिर्वाद
पारनेर / भगवान गायकवाड,
नुकतेच सेवानिवृत्त झालेले नेवासे पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी सुरेश पाटेकर व त्यांच्या पत्नी मंगल पाटेकर यांनी राळेगण सिद्धी ( ता. पारनेर ) येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची सदिच्छा भेट घेत निवृत्तीनंतरचा काळ सामाजिक कार्यासाठी देणार असल्याचा संकल्प व्यक्त करीत त्यांचे आशिर्वाद घेतले.
पाटेकर यांचा सेवापुर्ती समारंभ नुकताच देवगड (नेवासे) या ठिकाणी भास्करगिरी महाराज यांचे उत्तराधिकारी प्रकाशनंदजी महाराज यांच्या उपस्थितीत झाला होता. त्यानंतर पाटेकर यांनी राळेगण सिद्धीचा दौरा करीत हजारे यांची भेट घेत त्यांचे आशिर्वाद घेतले. त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. त्यांच्याशी चर्चा करताना जुन्या आठवणींना उजाळा देत अहमदनगर महाविद्यालयात असताना सन १९८८ मध्ये पिंपळगाव माळवी येथे राष्ट्रिय सेवा योजनेच्या शिबीरात अण्णांच्या मार्गदर्शनाने सामाजिक कार्याची प्रेरणा मिळाल्याचे सांगीतले. त्याचा उपयोग सांगली, शेवगाव, येवला ( जि. नाशिक ) व नेवासे आदी ठिकाणी प्रशासनात सेवा करताना झाला. प्रशासनात लोकसहभागाची जोड दिल्याने जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यात यश आल्याचे पाटेकर म्हणाले.
महिन्यातून चार दिवस राळेगणसिद्धी येथील अण्णांच्या सामाजिक उपक्रमात सहभागी होण्याचा संकल्प त्यांनी बोलून दाखविला. इतर वेळी शेवगाव तालुक्यात सामाजिक कार्यात सहभागी होणार असल्याचे ते म्हणाले. आरोग्य, शिक्षण व ग्रामविकासासाठी सेवानिवृत्तीचा वेळ देण्याची पाटेकर यांची संकल्पना हजारे यांनाही भावली. प्रशासकिय सेवेच्या काळात तसेच सेवानिवृत्तीनंतरही समाजाची सेवा सुरूच ठेवली तर प्रशासकिय अधिकारी समाजात सकारात्मक व रचनात्मक बदल घडवून आणतील असे हजारे यावेळी म्हणाले.