आत्मा व कृषी विभाग अहिल्यानगर यांचे शेतकरी बांधवांना मार्गदर्शन
पारनेर / भगवान गायकवाड,
सहकार व पणन विभाग आशियाई विकास बँक अर्थसाहित महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क,मॅग्नेट प्रकल्पांतर्गत महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे आणि आत्मा व कृषी विभाग अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय फुलपिके उत्तम कृषी पद्धती बाबत प्रशिक्षण कार्यक्रम हिंद स्वराज ट्रस्ट, राळेगण सिद्धी येथे आयोजित करण्यात आला होता.यावेळी मंगेश तिटकारे , व्यवस्थापकीय संचालक, एमसीडीसी पुणे, शिवपुरी पुरी, प्रकल्प उपसंचालक,मॅग्नेट नाशिक, राजकुमार मोरे प्रकल्प उपसंचालक आत्मा, अहिल्यानगर, गजानन घुले, तालुका कृषी अधिकारी,पारनेर हेमंत जगताप,मनुष्यबळ विकास तथा वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ साखर संकुल शिवाजीनगर पुणे, सनी काटे कृषी व्यवसाय तज्ञ, महेश वसईकर, श्री. धनराज देशेटवार मॅग्नेट प्रकल्प,नाशिक देवेंद्र जाधव,बीटीएम, आत्मा पारनेर आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडले.
मंगेश तिटकारे यांनी शेतकऱ्यांनी फुलपिके उद्योगातील भविष्यातील व त्यातील प्रक्रिया युक्त उपपदार्थांविषयी शेतकऱ्यांना अवगत केले. महामंडळामार्फत भविष्यातही अशा प्रकारचे जास्तीत जास्त कार्यक्रम अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये घेण्यात येतील असे सांगितले. श्री शिवपुरी पुरी यांनी मॅग्नेट प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली. व जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी प्रकल्पाचा लाभ घेण्याचे आवाहन केले. दिगंबर साबळे यांनी आपल्या मनोगतात महामंडळ अशा प्रकारचे कार्यक्रम राज्यातील सर्वच जिल्ह्यात आयोजन करीत असल्याचे सांगितले. गजानन घुले, तालुका कृषि अधिकारी.पारनेर यांनी अशा प्रकारचा कार्यक्रम पारनेर तालुक्यामध्ये घेतल्यामुळे महामंडळाचे व मॅग्नेट प्रकल्पाचे आभार मानले. सदर प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये डॉ. गणेश कदम यांनी खुल्या वातावरणातील शेवंती,निशिगंधा,ग्लॅडीओलस इत्यादी पिकांची सविस्तर माहिती दिली. राजन निफाडकर तांत्रिक अधिकारी के एफ बायो प्लांट यांनी नियंत्रित वातावरणातील जरबेरा कारनेशन व जिप्सफिला याची सविस्तर माहिती सांगितली. डॉ. शिवकुमार यांनी फुल पिकांचे किड व रोग नियंत्रण याविषयी सविस्तर माहिती सांगितली. पंडित शिकारे यांनी फुल शेतीमधील आपले अनुभव कथन केले. न्यू लीफ डायनामिक टेक्नॉलॉजी पुण्याचे श्री विवेक गिर यांनी बायोमास आधारित कोल्ड स्टोरेज तंत्रज्ञान सविस्तर समजावून सांगितले. सनी काटे यांनी मॅग्नेट प्रकल्पाविषयी माहिती व योजना सांगितली. धनराज देशेटवार लिंग समानता व सामाजिक समावेशन या विषयावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत जगताप यांनी केले तर आभार प्रदर्शन देवेंद्र जाधव यांनी मानले.सदर प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील जवळपास १८५ हून अधिक शेतकरी बांधवांनी सहभाग घेतला. सदर प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आत्मा व कृषी विभाग अहिल्यानगर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
फुलपिके उत्तम कृषी पद्धती बाबत एक दिवसीय प्रशिक्षण संपन्न
